फलटण चौफेर दि २८ ऑगस्ट २०२५
फलटण तालुक्यात सातत्याने जबरी चोरी, दरोडे व चैन स्नॅचिंगसारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीतील दोन सराईताना सातारा पोलीसांनी दोन वर्षांसाठी जिल्हाबाहेर हद्दपार केले आहे.हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे स्वप्नील उर्फ बाळु सुरेश जाधव (२४) व निखील उर्फ काळू/काळु सुरेश जाधव (२५, रा. तावडी, ता. फलटण) अशी आहेत. या दोघांविरुद्ध फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.
याबाबत फलटण शहर पोलीस स्थानकातून मिळालेल्या महितीनुसार,फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ नुसार हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी केली. सुनावणीनंतर तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा व हद्दपार प्राधिकरण यांनी दोन्ही गुन्हेगारांना संपूर्ण सातारा जिल्हा तसेच लगतचे पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, पुरंदर व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला.गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी हद्दपारी, नोक्का व एमपीडीएसारख्या कडक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या कारवाईत सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पो.हवा. प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, म.पा.कॉ. अनुराधा सणस तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याचे पो.हवा. बापू धायगुडे व पो.कॉ. जितेंद्र टिके यांनी महत्त्वपूर्ण पुरावे सादर केले.